राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने मोहीम सुरू केली आहे. तरी या पक्षांना 'अदृश्य हात' देणग्या देतच असतात. व हे पक्षही त्याचा स्वीकार करत असतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक राईटस (एडीआर) च्या एका अहवालानुसार देशातील राष्ट्रीय पक्षांनी २००४ ते २०२१ या काळात दरम्यान 'अज्ञात' स्त्रोतांकडून तब्बल सुमारे १६ हजार कोटी रुपये गोळा केले आहेत.
अशा अज्ञात स्त्रोतांकडून पैसा मिळवण्यात काँग्रेस (Congress) पक्ष आघाडीवर आहे. एडीआरच्या विश्लेषणातून मिळालेली माहिती अशी की केवळ २०२०-२१ या वर्षात अज्ञात स्त्रोतांकडून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ७०० कोटींच्या घरात आहे. भाजपने (BJP) किती पैसे गोळा केले याचा नेमका आकडा या अहवालात नाही.
या विश्लेषणासाठी आठ राष्ट्रीय पक्ष आणि २७ प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या गुप्त देणग्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress), माकप, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जम्मू-काश्मीरमधील नॅशनल पीपल्स यांचा समावेश आहे.
प्रादेशिक पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, शिवसेना (Shivsena), अकाली दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय कॉंग्रेस, द्रमुक, अण्माद्रमुक, आसाम गण परिषद आदी पक्षांनाही 'अज्ञात' स्त्रोतांकडून देणग्या मिळाल्या आहेत. विविध पक्षांचे आयकर परतावे आणि त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या देणग्यांच्या तपशीलांच्या आधारे केलेल्या या विश्लेषणात असेही आढळले आहे की २००४-०५ ते २०२०-२१ राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून १५ हजार ०७७ कोटी ९७ लाख कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे.